पावसाचा कहर! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे.हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा दिला आहे. येत्या १४ सप्टेंबरपासून पुढील तीन दिवस, म्हणजे १७ सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), परभणी, नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, वाशीम अशा ३० पेक्षा अधिक जिल्ह्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाने कहर केला आहे.गेल्या २४ तासांत मराठवाडा, रायगड आणि पनवेल परिसरात अधूनमधून जोरदार पाऊस झाला आहे. मात्र हा पाऊस सलग न पडता थोडा थांबून पुन्हा जोर धरतो आहे, त्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच नागरिकांना बाहेर न पडण्याचे आव्हान देखील प्रशासनाने केले आहे.पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रापर्यंत पसरल्याने राज्यभर ढगाळ हवामान आणि पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत.
दरम्यान राज्यात पुन्हा एकदा वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
