पुणे शहराला गुरुवारपर्यंत यलो अलर्ट, काळजी घेण्याचे आवाहन
पुणे : पुणे शहरातील बालेवाडी, कोंढवा, धनकवडी, आंबेगाव बु. सह काही भागांत रविवारी पावसाने दाणादाण उडवून दिली. यामुळे अनेकांची मोठी पळापळ झाली. यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे.
असे असताना आता आगामी चार ते पाच दिवस शहरात असेच वातावरण राहणार असल्याने पुणे वेधशाळेने सावधानतेचा इशारा दिला आहे. यामुळे या आठवड्यात देखील काळजी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, कोंढवा, वानवडी, महंमदवाडी परिसरात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला. यामुळे रविवारी बाहेर पडलेल्या अनेकांची पळापळ झाली.
कोंढवा गावठाण रस्त्याच्या कडेला असलेले झाडाच्या फांद्या खासगी मिनी बसवर कोसळल्या. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. मात्र, बसचे नुकसान झाले आहे. जोरदार वारे व विजांच्या कडकडाटामुळे परिसरातील नागरिकांत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.