रेल्वेचा प्रवास महागणार! आजपासून AC ते स्लीपर क्लासचा प्रवास होणार महाग, कसे असतील नवीन दर? जाणून घ्या…

मुंबई : आजपासून रेल्वेने तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. यामुळे देशातील सर्व प्रवाशांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. यामध्ये एसी ते स्लीपर क्लासपर्यंत सर्वच वर्गातील सगळ्यांचे दर वाढले आहेत. लोकल ट्रेन आणि मासिक सीझन तिकिटांच्या भाड्यांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
वाढ झालेल्या गाड्यांमध्ये नॉन-एसी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या सेकंड क्लास, स्लीपर आणि फर्स्ट क्लाससाठी दर 1 पैसे प्रति किमीने वाढवण्यात आले आहेत. एसी क्लासमध्ये ही वाढ 2 पैसे प्रति किमी इतकी आहे. हे दर लांबच्या गाड्यांना फरक पडणार आहे. दिल्ली ते लखनौसारख्या प्रवासात नॉन-एसी प्रवाशाला 5 आणि एसी 3-टायर प्रवाशाला 11 अतिरिक्त भरावे लागतील.
तसेच दिल्ली ते मुंबई प्रवासासाठी भाडेवाढ अनुक्रमे 14 आणि 28 इतकी आहे. ही दरवाढ राजधानी, शताब्दी, वंदे भारत, तेजस, हमसफर, दुरांतो, अमृत भारत, महामना, गतिमान, अंत्योदय, जन शताब्दी, युवा एक्सप्रेस, एसी विस्टाडोम आणि अनुभूती कोच अशा सर्व प्रीमियम गाड्यांवर आहे.
तसेच आरक्षण, सुपरफास्ट शुल्क आणि जीएसटी यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. येणाऱ्या काळात अनेक गाड्यांचे दर वाढण्याची देखील शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने भाडेवाढीचं समर्थन करत सांगितलं की, ऑपरेटिंग खर्च आणि प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
दरम्यान, या वाढीमुळे दरवर्षी सुमारे 1500 कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल, जो स्टेशन आणि ट्रेन सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरण्यात येईल, असेही सांगितले जात आहे. आता प्रत्यक्षात किती रुपये वाढणार हे लवकरच समजणार आहे.