Raigad Rains : रायगड किल्ल्यावर पावसाचा हाहाकार! धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल, पर्यटकांना प्रवेश बंदी…
Raigad Rains : रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आज ८ जुलैपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे.
रायगड किल्ले परिसरात काल सायंकाळी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे इतिहासात प्रथमच किल्ल्याच्या पायऱ्यांवरून अक्राळ विक्राळ स्वरुपात पाणी वाहू लागल्याने किल्ल्यावर आलेले पर्यटक अडकले होते. सुदैवाने हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत.
परंतु ही अचानक उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ३१ जुलैपर्यंत रायगड किल्ल्याकडे जाणारा पायरी मार्ग बंद करण्याचा मोठा निर्णय महाड तालुका प्रशासनाने घेतला आहे.
किल्ल्याच्या महादरवाज्यातून आणि पायरी मार्गावरून पाणी वाहू लागल्याने अनेक शिवभक्त पर्यटक अडकले होते, मात्र सर्व जण सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढगफुटी प्रमाणे पाऊस कोसळला.
यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वाहते, त्याप्रमाणे अतिशय अक्राळ विक्राळ पद्धतीने पायरी मार्गावरून पाणी वाहत होते. Raigad Rains
#किल्लेरायगड #Raigad रायगड किल्ल्यावर काल (रविवारी ता.7) ढगफुटी सदृष्य पावसामुळे धबधब्यासारखे पाणी वाहत होते. यामुळे पर्यटक वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाळ्याच्या पहिल्या काही दिवस गड किल्ल्यांवर पर्यटनास बंदी घालावी अशी आमची मागणी आहे. @CMOMaharashtra pic.twitter.com/VluLtE4Xn0
— Sahyadri Mountaineering Organization, (Reg) Junnar (@SahyadriJunnar) July 8, 2024
दरम्यान, दुसरीकडे, बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहत होते. ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर होते.
अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत वाहत्या पाण्यातून मार्ग काढत उतरत होते. त्यातील एका पर्यटकाने रायगडावरील दृश्याचे मोबाईल चित्रिकरण केले असून ते व्हायरल झाले आहे.