शिक्षण अधिकाऱ्याच्या घरी छापा! कारवाईत बेड बघितला अन् सगळ्यांनाच बसला धक्का, दिसला पैशांचा महापूर…

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरात टाकलेल्या छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील बेतिया जिल्हा शिक्षण अधिकारी (DEO) रजनीकांत प्रवीण यांच्या घरी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे याची चौकशी सुरू आहे.

त्यांच्या निवासस्थानावर बिहार दक्षता विभागाच्या अधिकार्यांनी छापा टाकला. बेतिया येथील मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील बसंत बिहार कॉलनीत जिल्हा शिक्षण अधिकारी रजनीकांत प्रवीण यांचे घर आहे. याठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, पाटण्यातील दक्षता पथकाने आज सकाळी निवासस्थानावर छापा टाकला. यावेळी कोणालाही आत जाण्याची किंवा बाहेर येण्याची परवानगी नव्हती. स्थानिक प्रशासन आणि दक्षता विभागाचे अधिकारी सध्या या प्रकरणावर बोलणे टाळत आहेत. या घटनेने मात्र प्रशासनात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ही कारवाई सुरू झाल्यानंतर पैसे सापडल्यानंतर याची मोजदाद सुरू झाली. मात्र नंतर इतके पैसे सापडले की मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आली. या कारवाईत दोन बेडभरून राेकड जप्त करण्यात आल्याने दक्षता विभागाचे अधिकारीही अवाक झाले आहेत.
दरम्यान, दक्षता पथकाने जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या अन्य मालमत्तेवरही छापे टाकले आहेत. याबाबत चौकशी सुरू आहे. डीईओ रजनीकांत प्रवीण गेल्या तीन वर्षांपासून बेतिया येथे कार्यरत आहेत. दक्षता पथक अनेक तासांपासून त्याच्या घरी उपस्थित आहेत. याबाबत चौकशी सुरू आहे.