लोणी काळभोरला गावठी हातभट्टी विक्री अड्ड्यावर छापा, ४९० लिटर साठा जप्त तर दोघे जेरबंद

लोणी काळभोर : गावठी हातभट्टी दारूची विक्री होत असलेल्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये ४९० लिटर दारूसह ५१ हजार रुपयेंचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना बेड्या ठोकल्या आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कारवाई ही कामगिरी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बाजारमळा परिसरातील मोगले वस्तीच्या कॅनॉलजवळ मंगळवार (७ एप्रिल) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास केली आहे. यामध्ये शिवाजी सुभाष फंड (वय २७) आणि सागर प्रकाश काळभोर (वय २८) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक भागवत गिरी यांनी फिर्याद दिली आहे.
सागर काळभोर यांच्या पत्र्याच्या घरामध्ये एक इसमाने हातभट्टीची तयार दारू कॅन्डमध्ये भरली असून लोकांना विक्रीसाठी ठेवली आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला, तेव्हा पत्र्याच्या घरासमोर दोन लोक संशयितरित्या थांबलेले दिसले. पोलीसांची चाहुल लागल्याने गावठी हातभट्टीची दारु विकत घेणारे दोन इसम त्या ठिकाणावरुन पळुन गेले. तर पोलिसांनी घटनास्थळावरून फंड व काळभोर यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी सदर ठिकाणची पहाणी केली असता, प्लॅस्टिकच्या प्रत्येकी ३५ लिटरच्या एकुण ८३ निळ्या व काळ्या रंगाच्या कॅन्डपैकी १४ कॅन्ड दारूने भरलेली आढळून आले. तसेच त्यांनी ही दारु आलताफ अख्तर उर्फ अली (रा. श्रीगोंदा आष्टी जि.अहिल्यानगर) याच्याकडून विकत आणल्याचे सांगितले. या छाप्यात ४९० लिटर दारू ३०० लिटरचा प्लास्टिक बॅरल असा एकूण सुमारे ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान नमुने जप्त करून उर्वरित दारू नष्ट केली आहे. तपासादरम्यान ही दारू बाहेरून मागवून स्थानिक पातळीवर विक्री केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपींच्या गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस उपयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, अरुण जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार अण्णा माने, महेश करे, सागर जगदाळे, पोलीस अंमलदार प्रवीण धडस, अशोक गिरी, सचिन सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
-गावठी दारू, जुगार, मटका तसेच इतर अवैध ब व्यवसायांमुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. अशा संबंधितांवर थेट कठोर कारवाई केली जाणार आहे. यापुढील काळात अशीच कडक मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. नागरिकांनीही अशा अवैध प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन राजेंद्र पन्हाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे)यांनी केले आहे.