Rahul Kul : केंद्र शासनच्या अमृत २.० योजनेमध्ये दौंड नगरपालिकेचा समावेश; आमदार राहुल यांची माहिती…

Rahul Kul : दौंड नगरपालिकेचा समावेश केंद्र शासनच्या अमृत २.० योजनेमध्ये झाला असून या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार ॲड राहुल कुल यांनी दिली आहे.
अटल मिशन फॉर रिजुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत २.०) या योजनेसाठी महाराष्ट्राला सुमारे ३१ हजार ७२२ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी पहिला टप्पा ९ हजार ३१० कोटी वितरीत देखील करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील फक्त दौंड नगरपालिकेचा समावेश अमृत २.० योजनेमध्ये करण्यात आला आहे.
या योजनेमुळे शहराचा पुढील २० वर्षाचा डीपी प्लॅन तयार होणार आहे. यामध्ये शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पुरेसे पाणी, जल वितरण व्यवस्था, पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन, प्रत्येक घरात नळ कनेक्शन, पाण्याचा बॅलन्स टॅंक, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि झाडांसाठी सांडपाणी वापरण्याच्या योजना अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. Rahul Kul
दरम्यान, या योजनेतून दौंड शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणार असून, शहराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. १५ वा वित्त आयोगातून हा निधी वितरीत केला जाणार आहे.
दौंड नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी अमृत २.० योजनेतून केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाकडून मोठा निधी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिल्ली येथे शहर विकास मंत्री यांचेकडे पाठपुरावा केला होता.