राहुल गांधी मानहानी खटल्यातील शिक्षेला देणार न्यायालयात आव्हान…!
अहमदाबाद : काँग्रेसनेते राहुल गांधीआज सुरत दौऱ्यावर आहेत. सन 2019 मध्ये केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी दाखल खटल्यात राहुल यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मानहानीच्या या प्रकरणात दोषी ठरवणारा दंडाधिकारी आदेश रद्द करण्यासाठी राहुल गांधी सुरतच्यान्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही राहुलसोबत सुरतला येणार आहेत. राहुल गांधी यांनी रविवारी त्यांची आई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. ही बैठक दीड तासांहून अधिक काळ चालली. यावेळी राहुल गांधी यांचे मेहुणे रॉबर्ट वाड्रा हे देखील उपस्थित होते.
दरम्यान , गेल्या महिन्यात सुरतच्या सीजेएम कोर्टाने राहुल यांना मोदी आडनाव बदनामी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आव्हान देण्यासाठी न्यायालयाने राहुल यांना एक महिन्याची मुदत दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका तयार करण्यात आली आहे. राहुल गांधी आज सुरतला पोहोचणार असून न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.