Radhakrishna Vikhe Patil : आता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, कृती समितीने मंत्री विखे पाटलांवर उधळला भंडारा…

सोलापूर : सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. अशातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण, सोलापुरात धनगर समाज आरक्षण कृती समितीने राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे.
धनगर आरक्षणाचा प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबीत असल्यानं धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी भंडारा उधळला आहे. सोलापूर शासकीय विश्रामगृहात घटना घडली आहे. शेखर बंगाळे असे या धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याचे नाव आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी सोलापुरात आले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. अशातच अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी तिथे येत होते, आपले प्रश्न मांडत होते.
ते लोकांची निवेदनं स्विकारत होते. अशातच धनगर आरक्षण कृती समितीच्या काही सदस्यांनी कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणासंदर्भातील निवेदन त्यांना देण्याची विनंती केली.
हे निवेदन राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) स्विकारत असताना कार्यकर्त्यांनी अचानक खिशातून भंडारा काढला आणि तो राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर उधळण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार बघताच राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगरक्षकांनी आणि समर्थकांनी तातडीने शंकर बंगाळे याला पकडले. या सगळ्यांनी शेखर बंगाळे याला खाली पाडून थोडीफार मारहाण केली. यानंतर पोलिसांनी शेखरबंगाळे याला ताब्यात घेतले.