गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा राडा! बार्शीतील कार्यक्रम पोलिसांनी पाडला बंद; कारण…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरू होणारा कार्यक्रम रात्री साडेनऊ दरम्यान सुरू झाला. दहा वाजण्याच्या सुमारास ऐनवेळी बार्शी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता घेत डीजे बंद केले व कार्यक्रम देखील बंद पाडायला भाग पाडले.
बार्शी तालुक्यातील शहराच्या मुख्य ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गौतमी पाटीलला यायला उशीर झाल्याने मोठ्या संख्येने प्रेक्षक ताटकळत उभे होते. यामुळे गौतमी पाटीलच्या लावणीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या बार्शीकराना एकच गाण्यांवर समाधान मानावे लागले.
राजेंद्र गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला २०० रुपये तिकीट आकारण्यात आले होते. तिकीटावर सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल असा उल्लेख होता. त्यामुळे अनेकांनी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाठिकाणी हजेरी लावली होती.
दरम्यान, गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू व्हायला रात्रीचे साडेनऊ वाजले. लावणीने कार्यक्रमास सुरुवात होताच १५ ते २० मिनिटांत पोलिसांनी कार्यक्रम बंद केला. गौतमीच्या चाहत्यांना फक्त एकाच लावणीवर समाधान मानावे लागले.