पुण्याच्या सुपुत्राचा ऑन ड्युटी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; आदित्य ठाकरेंना बॉडीगार्ड म्हणून होती सदैव साथ

पुणे : मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सुशील मोहन भांडे यांचा ऑन ड्युटी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने मुंबई पोलीस दलात शोककळा पसरली आहे. ते मूळचे पुण्याच्या भोरचे रहिवासी असून ते मुंबईच्या गोवंडीतील शिवाजी नगर पोलीस स्टेसनमध्ये कार्यरत होते.

मुंबई पोलीस सुशील मोहन भांडे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा बॉडीगार्ड म्हणून काही काळ काम केले होते. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले भांडे शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जायचे. त्यांच्या सेवाकाळात महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.त्यांच्या अचानक जाण्याने मुंबई पोलीस दलातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भांडे यांच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार करण्यासाठी भोंगवली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. त्यांच्या पार्थिवाला मुंबई पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी मानवंदना दिली. भोंगवली गावातील स्मशानभूमीत इतमामात आणि साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला.

यावेळी ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती दिसून आली. सुशील यांच्या अकाली जाण्याने भांडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.तसेच कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याने त्यांच्या मित्रपरिवाराने दु:ख व्यक्त केल आहे.