पुण्यात अवकाळी पावसाचा पहिला बळी! झाड अंगावर कोसळून महिलेचा जागीच मृत्यू…

पुणे : पुण्यात अवकाळी पावसाने धुमशान घातलं आहे. तासभर झालेल्या पावसामुळे पुण्यात ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. अचानक झालेल्या या पावसाने पहिला बळी घेतला आहे. सिंहगड रोड परिसरात झाड कोसळलं.

या दुर्घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अचानक अवकाळी पावसाने पुणे शहराला झोडपून काढले. सिंहगड रोड परिसरातही जोरदार पाऊस झाला.
नवश्या मारुती मंदिराजवळ पावसामुळे एक मोठे झाड कोसळले आणि त्या झाडाखाली तीन जण अडकले. या दुर्घटनेत रंजना नवनाथ गिरी या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. झाडाखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र रंजना गिरी यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोंढवा, उत्तमनगर, दापोडी, सिंहगड रोड, कोथरूड तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला.
काही भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी पाण्यात वाहनं बंद पडल्याच्या घटनाही समोर आल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.