पुण्यातील महागड्या घटस्फोटाची राज्यात चर्चा! केवळ 45 दिवसात संसार मोडला, बायकोला 45 लाखांची पोटगी दिली…

पुणे : पुण्यात वर्षभर चाललेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अवघ्या दीड महिन्याच्या संसारानंतर पसंत नसल्याचं आणि हुंडा-मानपान केला नसल्याचं कारण देऊन नववधूला घराबाहेर काढणाऱ्या पतीसह-सासरच्या मंडळींनी एकरकमी 45 लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शवली.

याची सध्या चर्चा सुरु आहे. नववधूने सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे दावे मागे घेतले असल्याची घटना समोर आली आहे. या दाम्पत्याचा विवाह जानेवारी २०२२ मध्ये मोठ्या थाटामाटात झाला होता. नवरी सासरी गेल्यानंतर काही दिवसांतच घरात वादाचे वातावरण सुरू झाले. लग्नात हुंडा व मानपान झाले नाही, अशी तक्रार होती.
पतीने, मला तू पसंत नाहीस घरच्यांच्या दबावाखाली मी हे लग्न केले, असे अनेकदा बोलले जाऊ लागले. अखेर वर्षभरापासून न्यायालयीन लढाई लढणाऱ्या एका दाम्पत्याचा परस्पर संमतीने घटस्फोट अर्ज न्यायालयाने मंजूर केला. एकरकमी पोटगीच्या बदल्यात प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. आरोपींना न्यायालयाने कायदेशीररीत्या मुक्तता दिली.

वाद मिटल्यानंतर दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी दिली. पती-पत्नीतील भांडणे चिघळल्यानंतर नवरीला सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढले, असा आरोप करून तिने पती, सासू, सासरा व नणंदेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याबाबत पोलिसांनी चौकशी करून संबंधितांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला व न्यायालयात आरोपपत्र सादर केले. मात्र, प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर पत्नीची बाजू लढविणाऱ्या ॲड. प्रियांका काटकर व ॲड. रेश्मा सोनार यांनी दोन्ही पक्षांचे समुपदेशन केले. यामध्ये पतीने ४५ लाख रुपये एकरकमी पोटगी देण्यास सहमती दर्शवली.