पुणेकरांनो तुमची विमानसेवा पुन्हा एकदा विस्कळीत, आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेत अडचणी, विमानसेवा रद्द…

पुणे : पुणेकरांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. थायलंडच्या सहलीचं नियोजन करत असाल तर, थांबा प्रसिद्ध विमान कंपनी ‘इंडिगो’ने आपल्या आगामी उन्हाळी हंगामातील पुणे-बँकॉक ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच २९ मार्चपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकातून इंडिगोने या मार्गावरील बुकिंग पूर्णपणे बंद केले असून, यामुळे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला मोठा धक्का बसला आहे.
सेवा रद्द करायचं काय आहे कारण?
इंडिगोने या निर्णयामागे कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. कंपनीने केवळ ‘कामकाजातील बदल’ असे उत्तर दिले आहे. मात्र, हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या मार्गावर प्रवाशांचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नव्हता.

सततच्या कमी प्रतिसादामुळे ही सेवा चालवणे कंपनीला व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यांनी या सेक्टरमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
पर्यायांचा अभाव: आता पुण्याहून बँकॉकला जाण्यासाठी केवळ ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ ही एकच कंपनी उपलब्ध असेल. त्यामुळे, या मार्गावर एकाच कंपनीची मक्तेदारी निर्माण झाल्यामुळे विमान तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासोबतच नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढतील अशी अपेक्षा होती, मात्र चालू सेवा बंद पडणे हे पुणे विमानतळाच्या विस्तारासाठी चिंताजनक आहे