पुणेकरांनो… मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक समोर, कसा असेल मार्ग? जाणून घ्या..

पुणे : देशभरात यंदा गणपती मिरवणूकांचा जल्लोष पहायला मिळणार असून ६ सप्टेंबर रोजी शनिवारी गावोगावी आणि घरोघरी बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जाईल. पुण्याच्या पारंपरिक गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे .

मानाच्या पाच गणपती बाप्पासह इतर गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पोलिस प्रशासन, मंडळे आणि स्वयंसेवक यांच्यात समन्वय साधून वेळापत्रक व मार्ग निश्चित करण्यात आले असून, यंदाची मिरवणूक नेहमीपेक्षा एक तास आधी, म्हणजे शनिवारी (६ सप्टेंबर) सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानाचे पाचही गणपती दुपारी १२ वाजेपर्यंत बेलबाग चौक पार करतील, असे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे मिरवणुकीला लागणारा वेळ कमी होईल आणि गर्दीचे व्यवस्थापन सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

पुण्यात विसर्जनादिवशी होणाऱ्या गर्दीच्या पाश्वभूमीवर यंदा विसर्जनाच्या वेळा प्रशासनानं ठरवून दिल्या आहेत . पुण्यातील गणेशोत्सवाचा उत्कर्षबिंदू असलेली विसर्जन मिरवणूक यंदा ठरावीक वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांना नियमावली कळवण्यात आली असून यंदा शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने मिरवणूक पार पडावी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीसंदर्भात यंदाचे वेळापत्रक आणि मार्ग जाहीर करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याची माहिती देत मिरवणूक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि वेळेत पार पडावी यासाठी नियमावली लागू केली असल्याचे सांगितले. शहरातील नागरिक आणि गणेश मंडळांना या नियमानुसारच सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मानाचे गणपती मिरवणुकीत..
पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती सकाळी ९:१५ वाजता मंडईतील टिळक पुतळा येथे पोहोचेल. त्यानंतर सकाळी 9:30 वाजता मिरवणुकीची सुरुवात होईल. कसबा गणपती सकाळी ९:३० वाजता बेलबाग चौकात दाखल होऊन १०.१५ वाजता लक्ष्मी रोडकडे मार्गस्थ होईल. दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती सकाळी १०:३० वाजता बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडकडे जाईल. सहावा मानाचा महापालिका गणपती आणि सातवा त्वेष्ट कासार गणपती दुपारी 1:00 वाजता मिरवणुकीत सामील होतील.
पुढील मंडळांची वेळ..
लक्ष्मी रोड आणि शिवाजी रोडवरील मंडळे दुपारी ३.४५ वाजता मुख्य मिरवणुकीत सामील होतील. श्रीमंत दगडूशेठ गणपती दुपारी ४:०० वाजता, तर जिलब्य मारुती आणि अखिल मंडई गणपती मंडळ संध्याकाळी ५:३० नंतर मिरवणुकीत सहभागी होतील. प्रशासनाच्या नियोजनानुसार संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत बेलबाग चौक रिकामा करण्यात येणार आहे.
मिरवणुकीचे मार्गदर्शक नियम..
मंडळांना ठरवून दिलेल्या मार्गानेच विसर्जन मिरवणुकीत सामील होता येणार आहे. लक्ष्मी रोडवरील मंडळे फक्त बेलबाग चौकातून प्रवेश करतील. कसबा गणपती जाईपर्यंत अलका टॉकीज चौकाजवळ इतर मंडळांना थांबावे लागेल. मिरवणुकीदरम्यान मंडळांमध्ये अंतर राखणे बंधनकारक असून रेषा तोडण्यास परवानगी नाही.
