पुणेकर चिंतेत! उत्तराखंडच्या महापुरात पुण्यातील 19 जण बेपत्ता, बचावकार्य सुरू, शेवटचा फोन आला अन्..

पुणे : उत्तराखंडमधील धारली गावात काल रात्री झालेल्या ढगफुटीने मोठे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे याठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेकजण बेपत्ता झाले आहेत. पुराच्या पाण्याने गावात हाहाकार माजवला असून अनेक जण बेपत्ता आणि काही मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. या नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले आहेत.
यामध्ये पुणे, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील 1990 सालच्या दहावीच्या बॅचमधील 19 जण बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये सगळ्यांनी एकत्र येत ट्रिप प्लॅन केली होती. सगळे उत्तराखंड पर्यटनासाठी रवाना झाले होते. त्यांचा शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून झाला होता.
नंतर मात्र दुपारी ढगफुटी झाल्यानंतर संपर्क तुटल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. काल सकाळी काही सदस्यांनी फोटो आणि स्टेटस शेअर केले होते. त्यांचा शेवटचा फोन आला तेव्हा समूहातील एका महिलेने तिच्या मुलाला फोन करून आम्ही सर्वजण सुखरूप आहोत, असे सांगितल्याचे समजते. मात्र त्यानंतर कोणाशी संपर्क झाला नाही.
याबाबत प्रशासन, पोलिस, आणि आपत्कालीन यंत्रणा तपास करत असून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत सरकारकडून हालचाल करण्याची मागणी केली जात आहे. सध्या स्थानिक प्रशासन आणि उत्तराखंड पोलिस यांच्याकडून बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी एनडीआरएफची पथकंही दाखल झाली आहेत.
तसेच याठिकाणी सोलापूर जिल्ह्याचेही चार तरुण अडकले आहेत. चौघांचेही फोन बंद आहेत. याबाबत सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, एनडीआरएफने जाहीर केलं आहे की मृतांमध्ये सोलापूरच्या कुठल्याही व्यक्तीचा समावेश नाही. याबाबत सगळ्यांचे लक्ष याठिकाणी लागले आहे.