पुणे झेडपीचं मोठं स्वप्न पूर्ण! ‘नवोदय’च्या धर्तीवर खानवडीत झेडपीची भव्य शाळा; महात्मा फुले जयंतीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण…

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचं नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर शाळा उभारण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे ‘ज्योती सावित्री जिल्हा शाळा’ ही अत्याधुनिक व भव्य शाळा उभारण्यात आली असून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आता मोफत आणि दर्जेदार सीबीएसई शिक्षण मिळणार आहे.

ही शाळा निवासी व अनिवासी अशा दोन्ही प्रकारात असून, १२ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियंत्रणाखालील ही देशातील पहिली सीबीएसई शाळा ठरत आहे.
या प्रकल्पासाठी फियाट इंडिया कंपनीकडून CSR अंतर्गत तब्बल २१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, तर बेंगळुरूच्या ‘क्रिस्टल हाउस इंडिया’ संस्थेमार्फत शाळा चालवली जाणार आहे. जिल्हा परिषदेला यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही.

विद्यार्थ्यांचा प्रवेश नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर गुणवत्ता आधारीत परीक्षेद्वारे होणार असून, खानवडी परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या शाळेचं उद्घाटन ११ एप्रिल (महात्मा फुले जयंती) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे आदी उपस्थित होते.
महात्मा जोतीराव फुले यांची ११ एप्रिल ही जयंती असून यंदापासून त्यांच्या द्विशतताब्दी जयंती वर्षाला सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर ११ एप्रिल रोजी या शाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या शाळेसाठी राज्य सरकारने पुणे जिल्हा परिषदेला १२ एकर गायरान जमीन उपलब्ध करून दिली असून त्याच ठिकाणी ‘ज्योती सावित्री’ निवासी व अनिवासी अशा दोन्ही प्रकारची आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभारण्यात आली आहे.
ही शाळा सुरू करण्याचा ठराव सन २०२२ मध्ये तत्कालीन पदाधिकारी व सदस्यांनी मंजूर केला होता. त्यानंतर काही महिन्यांत जिल्हा परिषदेवर प्रशासकराज लागू झाले. या कालावधीतच शाळेची इमारत व सर्व अद्ययावत सुविधा उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले. ऑक्टोबर २०२२ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली होती, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिली.
दरम्यान, महात्मा जोतीराव फुले यांच्या गावी खानवडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची जिल्हा परिषद शाळा सुरू करण्याचा ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. विशेष म्हणजे या ठरावाचे सूचक तत्कालीन सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आणि सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले वीरधवल जगदाळे होते.
यामुळे या शाळेच्या उभारणीसाठी पुढाकार घेणारे वीरधवल जगदाळे हेच आता अध्यक्ष या नात्याने शाळेचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे ‘सूचक ते उद्घाटक’ असा दुर्मिळ योगायोग या निमित्ताने घडत असल्याची चर्चा आहे.