Pune Zika Virus : पुण्यात झिकाचा धोका वाढला! ग्रामीण भागातही शिरकाव, रुग्णांची संख्या गेली १८ वर; जाणून घ्या कुठे वाढताहेत रुग्ण…

Pune Zika Virus : शहरात झिकाचा धोका वाढला असून, आणखी दोन गर्भवतींना संसर्ग झाल्याचे गुरुवारी समोर आले. यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या १८ वर पोहोचली आहे. तर पुण्याच्या ग्रामीण भागात देखील झिका बाधित रुग्ण आढळले आहे.
सासवडमध्ये एका वृद्ध व्यक्तीला झिकाचा संसर्ग झाल्याचे तपासात उघड झाले आहे. यामुळे झिकाबाधितांची रुग्णसंख्या ही १८ वर पोहोचली आहे. यातील १० गर्भवती महिला आहेत. शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे झिकावर उपाय योजना सुरू आहे.
पुण्यात झिका बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेचे आरोग्य कर्मचारी सर्वेक्षण करत आहेत. गुरुवारी खराडी परिसरातील दोन गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. यातील एक महिला ही ३२ तर दुसरी ही २५ वर्षांची आहे.
या दोघींच्याही ॲनोमली स्कॅन अहवाल बाळाची प्रकृती चांगली असल्याचे दिसत आहे. खराडीत आणखी एक झिका बाधित आढळला आहे. येथील ८ गर्भवती महिलांचे नमुने हे तपासणीसाठी एनआयव्ही प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यातील दोघींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यांना झिकाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. Pune Zika Virus
पुण्यात १८ जण झिका बाधित आढळले आहेत. प्रामुख्याने एरंडवणे परिसरात हे रुग्ण सापडले आहेत. एकूण रुग्णांपैकी ६ रुग्ण हे एरंडवणे परिसरातील आहे.
तर त्यानंतर पाषाण व खराडी येथे देखील ३ रुग्ण आढळले आहेत. तर मुंढवा येथे २ रुग्ण. तर डहाणूकर कॉलनी, उजवी भुसारी कॉलनी, आंबेगाव बुद्रुक आणि कळस येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू केल्या आहेत.