Pune : गादी कारखान्यातील यंत्रात अडकून कामगार ठार, एक जखमी, यंत्रचालकाविरुद्ध गुन्हा दाखल…

Pune : गादी कारखान्यातील यंत्रात अडकून (फोम मिक्सर मशीन) कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
कारखान्यात फोम मिक्सर यंत्राची सफाई करण्यासाठी दोन कामगार या यंत्रात उतरले होते. मात्र, यावेळी कारखान्याच्या यंत्रचालकाने मशीनमध्ये कुणी आहे का ? याची खातरजमा न करता मशीन सुरू केल्याने एका कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला तर दूसरा कामगार जखमी झाला आहे.
या प्रकरणी कारखान्याच्या यंत्रचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अर्षद अन्सारी (वय २७, रा. मनुकेरी, पलामु, झारखंड) असे मशीनमध्ये अडकून ठार झालेल्या कामगारांचे नाव आहे. तर कैलास भारत कौल (वय २१, रा. सध्या रा. वडकीनाला सासवड रस्ता, मूळ रा. रोहनीया, देवगाव, मध्यप्रदेश) असे जखमी झलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याच्यावर एका दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गादी कारखान्यातील यंत्रचालक अमित बल्लु धुर्वे (वय २५, सध्या रा. वडकीनाला, सासवड रस्ता, मूळ रा. बम्हनी, छिंदवाडा, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, वडकीनाला येथे स्नुज हब कम्फर्ट अँड स्लीप रेडीफाईन्ड या कंपनीत गादी, उशी तयार केली जाते. रविवारी ( ता.१) सर्व कामगार कंपनीत आले होते. त्यावेळी कौल आणि अन्सारी फोम मिक्सर यंत्रातील साठलेला कापूस, तसेच कचरा काढण्याचे काम करत होते.
यंत्राची साफसफाई करत असताना यंत्रचालक धुर्वे याने यंत्रात काेणी उतरले का नाही, याची खातरजमा केली नाही. त्याने अचानक यंत्र सुरू केले. यंत्रात अन्सारी अडकल्याने गंभीर जखमी झाला. कौल याचा पाय यंत्रात अडकल्याने तो ओरडला. कंपनीतील कामगारांनी यंत्रात अडकलेल्या कौलला बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या अन्सारी याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख तपास करत आहेत.