पुणे-मुंबई रेल्वे प्रवासात प्रवाश्यांचा वाद मिटणार, रेल्वे ने काय पर्याय काढला पहा …!
पुणे : पुणे- मुंबई या दरम्यान नोकर , व्यवसायाच्या निमित्ताने नियमितपणे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेकजण पास काढून नियमितपणे प्रवास करतात. मात्र पास धारक आणि इतर प्रवाशांमध्ये काही दिवसांपासून सीटवर बसण्यावरुन वाद होत आहेत. अशा वादाचे प्रकार देखील समोर आले आहेत. यावर रेल्वेने उपाय काढला असून यामुळे आता वाद मिटणार असल्याचे बोलले जात आहे.
रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. त्याचा फायदा अनेक प्रवाशी घेत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत आहे. परंतु वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे जास्त आहे. यामुळे पुणे-मुंबई नियमित प्रवास करणारे एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य देतात. त्यांच्यांसाठी एक्स्प्रेसला एक डबा वाढवण्यात आला आहे.
सिंहगड एक्स्प्रेसमधून दररोज हजारो चाकरमानी पुणे- मुंबई प्रवास करतात. मागील काही दिवसांपासून नवीन आणि जुने पासधारक यांच्यातील वाद होत आहे. नुकतेच जून्या पास धारकांच्या सात जणांच्या टोळक्याने बसण्याच्या कारणावरून एका प्रवाशाला बेदम मारहाण केली होती. त्यापूर्वी पंधरा दिवसात सिंहगड एक्सप्रेसमध्ये ५ फ्री स्टाईल हाणामारीच्या घटना घडल्याचे उघड झाले आहे.
सर्वसामान्य नागरिक आणि प्रवासी संघटनांकडून सिंहगड एक्स्प्रेसचे कोच वाढवण्याची मागील काही दिवसांपासून केली जात होती. अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने सिंहगड एक्स्प्रेसला एक द्वितीय श्रेणी चेयर कार (नॉन-एसी) डब्बा वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे.