पुण्यातील तलाठी -अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले ; तब्बल 27 हजार सातबाऱ्यावरील नोंदी चौकशीच्या कचाट्यात

पुणे : पुणे जिल्ह्यातील लिखित सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल 27 हजार सातबाऱ्यांवरील नोंदी चौकशीच्या कचाट्यात सापडल्या आहेत. सातबारा लेखन प्रमादाच्या नावाखाली झालेल्या दुरुस्त्यांमुळे जिल्ह्यातील तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसह तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्याच्या भूमी विभागाकडून अभिलेख सातबाऱ्याचे संगणकीकरण करण्यात आले आहे. संगणकीकरण करताना त्यात लेखन प्रमादाच्या नावाखाली अनेक चुका झाल्या आहेत. त्या चुका दुरुस्ती करण्यासाठी महसूल अधिनियमाच्या कलम १५५ नुसार, हे अधिकार तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र तरीही त्यात त्रुटी आढळून आल्या.राज्य सरकारकडे याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. राज्यात सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यात आढळल्याने नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने पुणे जिल्ह्यातील २७ हजार सातबाऱ्यांच्या नोंदीचीं कसून चौकशी सुरू केल्याने अनेक अधिकारी रडारवर आले आहेत.
गेल्या पाच वर्षांत लिखित सातबाऱ्यांमध्ये दुरुस्ती करताना सातबाऱ्यातील हस्तलिखितातील दोष दूर करणे अथवा दुरुस्त करणे अपेक्षित होते. मात्र, हस्तलिखितांमधील नावे चुकविणे, क्षेत्र चुकविणे, नवीन शर्तीचे शेरे, कूळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे, आकारीपड बाबतचे शेरे, वारसांच्या नोंदी वैध आणि कायदेशीर नोंदीच्या दुरुस्त्या केल्याचे आढळले आहे.