पुणे हादरलं ; तरुणीला ‘तो ‘फोटो व्हायरल करण्याची धमकी, ब्लॅकमेलींगला कंटाळून अखेर उचललं टोकाचं पाऊल…

पुणे : विद्येचं माहेरघर असलेले पुणे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनामुळे चांगलेचं चर्चेत आले आहे. अशातच आता वडगाव मावळमधील बावीस वर्षीय तरुणीने ब्लॅकमेलिंगला कंटाळून टोकाचे पाऊल उचललं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी रणजित देशमुख व अभिषेक ढोरे या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांचा तिसरा साथीदार प्राण येवले हा फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ मध्ये राहणाऱ्या बावीस वर्षीय पीडितेचे आरोपी रणजित देशमुख सोबत कॅफेमधील काही खासगी फोटो होते. आरोपी रणजित पिडीतेला हे फोटो व्हायरल करण्याची सतत धमकी देत होता. तसेच त्याचे मित्र अभिषेक ढोरे व प्राण येवले हे देखील मुलीसोबत मैत्री करण्याचा सतत आग्रह करीत होते. इतक्यावरच न थांबता या आरोपींनी पीडितेला तिचे लग्न मोडण्याची व आई वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत होते.या सततच्या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान मुलीच्या मृत्यूनंतर कोलमडलेल्या कुटुंबीयांनी तडक पोलीस स्टेशन गाठून गुन्हा दाखल केला.या प्रकरणाची गंभीर दखल घेत वडगाव मावळ पोलिसांनी आरोपीना अटक केली असून एक जण फरार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. तसेच या घटनेने पीडितेच्या कुटुंबाकडून आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.