पुणे हादरलं! वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती, ‘तु पांढऱ्या पायाची आहे’ म्हणत विवाहितेसोबत भयंकर कृत्य…


पुणे : पुणे शहर पुन्हा एकदा हादरले असून, वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवानं या घटनेत तिचा जीव वाचला आहे.

त्यानंतर विवाहितने दाखल केलेल्या तक्रारीवरून पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . ही घटना पुण्यात महिलांवर होणाऱ्या छळाचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आणते.

या घटनेतील पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे अजय पवार यांच्याशी २२ मे २०२२ रोजी लग्न झाले होते. लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांतच पती अजय पवारने घरगुती कारणावरून आपल्या पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सासूनेही पीडितेला, तू माहेरावरून काय आणले आहेस? तुझ्या आई-बापाला काही मिळत नाही, तुमची काही लायकी नाही, असे म्हणून हिणवले.

पती अजय पवार हा देखील पीडितेला, मी तुझ्याशी टाइमपास केला, आता तू मेली तरी चालेल. मला पैशाची गरज आहे, मला चारचाकी गाडी घेऊन देण्यास सांग तुझ्या बापाला, असे म्हणू लागला. पीडितेने गाडी घेऊन देण्यास नकार दिल्यानंतर पतीने आपला गळा दाबून मारहाण केली. दीर मनोज पवार याने देखील आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

२१ मे रोजी पीडितेच्या सासूने पुन्हा एकदा तिला त्रास दिला. “पहिल्या सुनेलाही घराबाहेर काढले तसेच तुलाही बाहेर काढीन, अशी धमकी सासूने तिला दिली. तू पांढऱ्या पायाची आहेस, तुझी नजर चांगली नाही, तू घरात आल्यापासून शांतता नाही, असे म्हणून तिला हिणवले. हा सर्व त्रास सहन न झाल्याने या तरुणीने रागाच्या भरात झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत या पीडितेचा जीव वाचला.

दरम्यान, या घटनेनंतर तिने दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात पीडितेचा पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!