तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! दोन चिमुकल्यांसह महिलेचा निर्घृण खून, मृतदेहासोबत केलं भयंकर कृत्य, घटनेने उडाली खळबळ..

पुणे : पुणे जिल्ह्यातील रांजणगावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं तिहेरी हत्याकांड घडलं आहे. एका महिलेसह तिच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

रांजणगाव खंडाळे परिसरातील अहिल्यानगर महामार्गाजवळ ग्रोवेल कंपनीच्या मागच्या बाजूला अर्धवट जळालेले हे तीन मृतदेह सापडलेत्यामुळे रांजणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या महिलेची आणि तिच्या लहान मुलांची हत्या केल्याचा संशय आहे. त्यामुळे हा मारेकरी कोण, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळे येथील ग्रोवेल कंपनीचे कामगार कंपनीत आले असताना काही कामगारांना कंपनीच्या पाठीमागे लक्ष्मी मंदिराजवळ एका महिलेसह दोन लहान बालकांचे मृतदेह पावसामध्ये पडल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती पोलीस पाटील सीमा पंडित यांनी पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब येळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाची महिला, तसेच अंदाजे ३ ते ४ वर्षे व १ ते २ वर्षे वयाच्या एका मुलाचा मृतदेह आढळून आला आहे.
दरम्यान, या वेळी तिघांचे मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच घटनास्थळी अंगुली पथक व श्वानपथक आले होते. मात्र, या महिला व मुलांबाबत काहीही माहिती मिळाली नाही.
