शाळा बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीनं पुणे हादरलं, मुलांसह शाळा प्रशासनाचे धावपळ, नेमकं घडलं काय?

पुणे : हिंजवडीतील एका नामांकित इंटरनॅशनल शाळेला ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी प्राप्त झालेल्या या मेलमध्ये शाळेत बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख होता.

घटना घडली तेव्हा शाळेत तब्बल 390 विद्यार्थी उपस्थित होते, त्यामुळे प्रशासन आणि पालकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. माहिती मिळताच शाळा तातडीने रिकामी करण्यात आली आणि सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

शाळेच्या व्यवस्थापनाने तातडीने हिंजवडी आणि पिंपरी चिंचवड पोलिसांना कळवले. काही क्षणातच पोलिस पथक, बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. पहिल्या टप्प्यात शाळेच्या संपूर्ण परिसराची सुरक्षा तपासणी करण्यात आली. उच्च सतर्कतेच्या वातावरणात दोन तासांपेक्षा जास्त वेळ काटेकोर शोधमोहीम चालवण्यात आली आहे.

दरम्यान, धमकीचा मेल कोणत्या पत्त्यावरून पाठवण्यात आला, त्यामागील उद्देश काय, आणि हा खोडसाळपणा कोणी केला, याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे. मेलमध्ये दुपारी शाळेत मोठा स्फोट होणार असल्याचा उल्लेख असल्याने पोलिसांनी परिस्थिती अत्यंत गांभीर्याने घेतली. विद्यार्थ्यांना त्वरीत घरी पाठवण्यात आले, तर शाळेतील कर्मचारीही सुरक्षिततेसाठी बाहेर हलवण्यात आले.
प्राथमिक तपासाअंती हा ई-मेल खोटा असल्याचे स्पष्ट झाले असले तरी पोलिसांनी सायबर अँगलवरून सखोल चौकशी सुरू ठेवली आहे. अशा प्रकारच्या धमक्या कोणत्या हेतूने दिल्या जातात आणि यामागे मोठं नेटवर्क आहे का, याबाबतही पडताळणी केली जात आहे.
