पुणे रिंगरोड भूसंपादनास मिळाली गती, निधीही झाला उपलब्ध, मोजणी अंतिम टप्प्यात…
पुणे : पुणे रिंग रोडच्या भूसंपादनासासाठी राज्य शासनाने एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे भूसंपादनाला गती आली असून, आता पूर्व भागातील जागेची मोजणी अंतिम टप्प्यात आली आहे.
पुरंदर तालुक्यातील सात, हवेली तालुक्यातील तीन आणि भोर तालुक्यातील दोन अशा १२ गावांच्या मोजणी शिल्लक असून, ३१ ऑगस्टपर्यंत या मोजण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पश्चिम भागातील रिंग रोड हा ३८ गावांमधून जात आहे. पश्चिम भागात मावळमधील सहा, हवेलीतील ११, भोर तालुक्यातील पाच गावांमधून हा रिंग रोड जात आहे.
त्या गावांच्या मोजणी पूर्ण होऊन आता त्या ठिकाणच्या जमिनींचे संपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे, पूर्व भागातील रिंग रोडची मोजणी ही संपुष्टात येण्यास थोडा विलंब लागत आहे.
पूर्व भागातील मावळमधील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५ आणि पुरंदर तालुक्यातील सात आणि भोरमधील तीन अशा ४८ गावांचा समावेश आहे. पूर्व भागातील खेड, मावळ तालुक्यातील गावांची मोजणी झाली आहे.
उर्वरित बारा गावातील मोजणी ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार…
तसेच हवेली तालुक्यातील तीन, पुरंदरमधील सात आणि भोर ताुक्यातील एक अशा १२ गावांची मोजणी बाकी असून, आतापर्यंत ३७ गावांची मोजणी झाली आहे. ऑगस्टपर्यंत उर्वरित गावांची मोजणी पूर्ण करण्याचे संकेत दिले आहे.
रस्ते विकास महामंडळाने हवेली, भोर तालुक्यांमधून रिंग रोडची केलेली आखणी आणि एनएचएआयच्या आखणीमध्ये रस्त्यांच्या रुंदीमध्ये फरक होता.
एनएचएनएआयने रिंग रोडच्या रस्त्यांची १०० मीटर रुंदी, तर रस्ते विकास महामंडळाने ९० मीटर एवढी रुंदी ग्राह्य धरली होती. त्यामुळे अखेर एनएचएआयने केलेली आखणी कायम ठेवली आहे, असे सांगण्यात आले.