पुणेकरांची वीज बिलाची चिंता मिटली!1 एप्रिल पासून बिलात होणार कपात, महावितरणचा मोठा निर्णय

पुणे: कडाक्याच्या उन्हात एसी आणि कुलरच्या वापरामुळे वाढणाऱ्या वीज बिलाची चिंता आता काहीशी मिटणार आहे. राज्य सरकारने वीजदराबाबत सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल पासून नवीन वीज दर लागू होणार आहेत.त्यामुळे 10 ते 14 टक्क्यांनी वीजदर कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण कमी होणार आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या वीजदर कपातीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलं आहे. यामुळे आता 1 एप्रिलपासून घरगुती वीज दरांमध्ये सरासरी 30 पैसे प्रतियुनिट कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुणे परिमंडळातील सुमारे 38 लाख ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, महिन्याकाठी तब्बल 10 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
पुणे परिमंडळातील लाभार्थी-

पुणे शहर, आंबेगाव, राजगुरुनगर आणि हवेली या भागांतील 38 लाख 71 हजार ग्राहकांना याचा थेट फायदा होणार आहे.
नवीन वीज दरानुसार विजेच्या वापराच्या सर्व चारही टप्प्यामधील दरामध्ये कपात करण्यात आली आहे. महावितरण, बेस्ट,अदानी आणि टाटा पॉवर या कंपन्यांनी घरगुती कपात केली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून सर्वांनाच वीज बिल कमी येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.