पुणे रेव्ह पार्टी अपडेट ; खराडीत शुक्रवारीही रंगली होती पार्टी ; पोलिसांकडून चौकशी सुरू..

पुणे : पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सातही आरोपींच्या घराची झडती घेतली आहे. आता या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या नावाने शुक्रवार ते रविवार दरम्यान हॉटेल स्टेबर्ड सूटमध्ये रूम बुक करण्यात आली होती. या ठिकाणी शुक्रवारीही पार्टी झाली होती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून, त्याचीही चौकशी केली जात आहे.

खराडी येथील ड्रग पार्टी प्रकरणी पोलिसांनी डॉ. प्रांजल खेवलकर, निखील पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव, ईशा सिंग आणि प्राची शर्मा या सात जणांना अटक केली आहे. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शुक्रवारीच्या पार्टीत निखील पोपटाणी, श्रीपाद यादव आणि दोन तरुणी उपस्थित होत्या. त्या पार्टीतही अमली पदार्थांचे सेवन झाले का, याचा तपास सुरू आहे. हॉटेलमधील तीन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवले असून, चौकशी सुरू आहे.

दरम्यान पोलिसांना सातही आरोपींच्या घराच्या झडतीदरम्यान कोणतेही अंमली पदार्थ आढळले नाहीत. मात्र पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप आणि मेमरी कार्ड जप्त केले आहेत. तसेच आरोपीने व्हाट्सअप आणि इंस्टाग्रामद्वारे पार्टीचे प्लॅनिंग केल्याची माहिती देखील पोलीस तपासातून समोर आली आहे.

