Pune : पुण्यातील तीन पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, नेमकं प्रकरण काय?, जाणून घ्या..
Pune : ससून रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करुन पुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना मोक्क्यातील आरोपीने बेडीतून हात काढून घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी तिघांना निलंबित केल्याची माहिती आहे.
पोलीस अंमलदार सुशांत राजेंद्र भोसले, विठ्ठल बप्पाजी घुले, सुरज हिराचंद ओंबासे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.
नेमकं घडलं काय?
येरवडा पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये मोक्कातील गुन्ह्यात अटक केलेल्या तिघा आरोपींना ठेवण्यात आले होते. आरोपी निखिल मधुकर कांबळे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) हा सोमवारी २१ ऑक्टोंबर रोजी सकाळपासून पोटात दुखत असल्याची तक्रार करत होता.
त्यामुळे त्याला व त्यांच्या दोन साथीदारांना घेऊन ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा आदेश या तिघांना देण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी तिघांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर परत पोलीस ठाण्यात येत असताना गुंजन चौकात कांबळे याने खूप त्रास होत आहे. Pune
दरम्यान, पाणी द्या नाही तर मला काहीतरी होईल असे बोलून गयावया करु लागला. तेव्हा रात्री पावणे दहा वाजता पाणी आणण्यासाठी गाडी थांबविण्यात आली. त्याचवेळी निखिल कांबळे याने त्यांच्या डाव्या हातातील बेडीमधून हात अलगद काढून गाडीचा दरवाजा उघडून पलायन केले होते.