पुणे पोलिसांची कामगिरी : दोन वर्षापासून आरोपीचा पोलिसांना गुंगारा, अखेर 3 रात्र पार्किंगमध्ये रचला सापळा अन….

पुणे : मागील दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला पुणे पोलिसांनी सापळा रचून अखेर अटक केली आहे. आरोपी पुण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाने दोनशेहून अधिक सीसीटीव्ही तपासून त्याचा माग काढला. त्यानंतर तीन रात्र जागरण करून वीसहून अधिक सोसायट्यांचे पार्किंग तपासून आरोपीची गाडी शोधली आणि सापळा लावून त्याला पहाटेच्या वेळेस अटक केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विशाल लक्ष्मण भोले (वय ३२, रा. ताडीवाला रोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 2017 मध्ये महिलेची फसवणूक करून तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याच्या आरोपावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने तिला दोन वेळा गर्भपात करायला भाग पडले. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा घडल्यानंतर तो फरार झाला होता, तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. गेल्या दोन वर्षापासून विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली जात होती,मात्र तो सापडला नव्हता. अखेर त्याला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आल आहे.
दरम्यान पोलीस आरोपीचा शोध घेत असताना विशाल भोंडे ताडीवाला रस्ता परिसरात मित्राला भेटून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला यामध्ये संशयित आरोपी दिसून आल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला. दरम्यान ३१ जुलैच्या मध्यरात्री सोसायटीच्या पार्किंग मध्ये संशयित आरोपीची गाडी दिसली.पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अखेर ताब्यात घेतले.