पुण्यातील पोलीस कर्मचारी बेपत्ता! लेकीच्या वाढदिवसाला भावनिक स्टेटस ठेवलं अन्….

पुणे : अलीकडच्या काळात सातत्याने पुण्यातील वाढती गुन्हेगारी चर्चेचा विषय असतो. पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना येत असलेले अपयश या मुद्द्यावरुन अनेकदा टीका होते. मात्र, आता पुणे पोलीस दलातील अंतर्गत वादातूनच एक पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.
पुण्यातील यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक निखिल रणदिवे हे 5 डिसेंबरपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितल्यानंतर पोलीस दलाकडून त्यांना शोधण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
त्यांच्या शोधासाठी पाच पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. निखिल रणदिवे यांना त्यांच्या वरिष्ठांकडून त्रास दिला जात होता. याच त्रासाला कंटाळून निखिल रणदिवे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे पुणे पोलीस दलातील अंतर्गत वाद आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांची मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांकडून मनामानी पद्धतीने केल्या जाणाऱ्या पिळवणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

निखिल रणदिवे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वीच निखिल रणदिवे यांची शिक्रापूर पोलीस ठाण्यात बदली झाली होती.

मात्र, नारायण देशमुख हे निखिल रणदिवे यांना कार्यमुक्त करण्यास नकार दिला. तसेच मुलीच्या आजारपणात आणि तिच्या पहिल्या वाढदिवसाला सुट्टी मागितली असता, ती नाकारण्यात आल्याने रणदिवे प्रचंड मानसिक तणावात होते.
मानसिक छळ आणि गेल्या वर्षभरापासून हुकूमशाही पद्धतीने वागणूक मिळत असून, सततच्या मानसिक छळाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. निखिल रणदिवे यांच्या पोस्टमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हेदेखील नारायण देशमुख यांना वाचवत असल्याचा आरोप रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस दलाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
