Pune Police : पुण्यात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून प्रकरण! ओंकार कापरेसह १० जणांवर मोक्का, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून ६२ टोळ्यांवर कारवाई…


Pune Police पुणे : ढोलपथकामध्ये सराव करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याचा खून करणाऱ्या ओंकार चंद्रशेखर कापरे याच्यासह इतर १० साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ६२ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police)

अल्पवयीन मुलगा कोंढवा खु. मनपा शाळेमागे ढोलपथकामध्ये सराव करण्यासाठी गेला होता. मात्र, तो उशीरापर्यंत घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी कोंढवा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. कोंढवा पोलिसांनी आयपीसी 363 नुसार गुन्हा दाखल करुन मुलाचा शोध सुरु केला. त्यावेळी बेपत्ता मुलाचा मृतदेह सासवड परिसरात आढळून आला होता.

याप्रकरणी टोळी प्रमुख ओंकार चंद्रशेखर कापरे (वय. २७) रा. कोंढवा खुर्द, पुणे), साईराज राणाप्रताप लोणकर (वय. २३ रा. होले वस्ती चौक, उंड्री), प्रणय सुनिल पवार (वय. १९ रा. कोंढवा), सौरभ उर्फ दत्ता माणिक तायडे (वय. १८ रा. मारुती आळी, बाबर चौक, कोंढवा खु.), कृष्णा प्रकाश जोगदंडे (वय. २० रा. कमलदिप पार्क, कोंढवा खु.), महादेव उर्फ पप्पु गोविंद गजाकोष (वय. १९ रा. शिवनेरीनगर लेन नं.6, कोंढवा खु.), रोहन अनिल गवळी (वय. २१ रा. कोंढवा खु.) यांना अटक करुन दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर राज ठोंबरे (रा. शिवनेरीनगर, कोंढवा खु.), अमन (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

तसेच निल खवळे याला आमची टीप देतो या कारणावरुन आरोपींनी अल्पवयीन मुलाचे कोंढवा येथून चारचाकी गाडीतून अपहरण केले. मंतरवाडीच्या आसपास अपहरण केलेल्या मुलाला झाडाच्या फांद्यांनी मारहाण केली. त्यानंतर सासवड येथील दिवे घाटाजवळील टेकडी जवळच्या खोली नेऊन त्याला फावड्याच्या दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी होऊन अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. याबाबत आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कलम वाढ करण्यात आली.

आरोपी टोळी प्रमुख ओंकार कापरे याने गुन्हेगारांची संघटित टोळी तयार करुन टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी संघटित व वैयक्तीक खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, शस्त्राने जखमी करणे, शस्त्र बाळगणे, दंगा, मालमत्तेचे नुकसान, पोलीस आदेशाचा भंग, नागरिकांना मारहाण करुन जखमी करणे, शिवीगाळ करुन हत्यारांचा धाक दाखवून दहशत निर्माण करणे, चोरी यासारखे गंभीर गुन्हे कोंढवा व वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी परिमंडळ-5 पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!