Pune : पुणे जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…
Pune : पुणे जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये रविवार ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदशनाखाली हे आयोजन करण्यात आले आहे.
वाद आणि इतर प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकरीता हे ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये बँकेचे कर्जवसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयक बद्दलची प्रकरणे, आपापसात तडजोड करण्याजोगी प्रकरणे, इतर फौजदारी प्रकरणे, वैवाहिक आणि इतर वाद अशी दाखलपूर्व प्रकरणे सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
तसेच यामध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली मोटार अपघात नुकसान भरपाई, भूसंपादन, महसूल व इतर दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकूमाचे दावे, विशिष्ट पूर्व बंद कराराची पूर्तता हे वाद मिटवले जाणार आहेत.
विशेष म्हणजे अदालतीमध्ये तृतीयपंथीयांचा देखील पॅनल मेंबर म्हणून समावेश केला आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे आकारले जाणार नाहीत. या न्यायालयातील निवाड्यावर अपील नाही. Pune
याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल एस. पाटील यांनी सांगितले की, कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. प्रलंबित अथवा दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरिता संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयाशी संपर्क साधावा.
तसेच लोक अदालतीमध्ये सहभागी होवून आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत, असेही त्यांनी सांगितले आहे. सध्या याची जोरदार तयारी प्रशासनाकडून केली जात आहे.