Pune News : पुण्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह ९ कर्मचारी निलंबित, पोलीस दलात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Pune News पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय ३४) याने पोलिसांना चकवा देऊन पलायन केले होते. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली असून, एका अधिकार्यासह ९ पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

सोमवारी रात्री एक्स-रे काढण्यासाठी आणल्यानंतर त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. ललित पाटील ड्रग्ज विक्री प्रकरणात 4 कर्मचारी, तर पाटील याने ससूनमधून पलायन केल्याप्रकरणी महिला अधिकार्यासह ५ जणांना निलंबित करण्यात आले आहे. Pune News
सहायक फौजदार जर्नादन काळे, पोलिस कर्मचारी विशाल टोपले, स्वप्निल शिंदे आणि दिगंबर चंदनशिव, अशी ड्रग्ज रॅकेट प्रकरणात निलंबित केलेल्या कर्मचार्यांची नावे आहेत.

तर, पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, पोलिस नाईक नाथाराम काळे, पीरप्पा बनसोडे आणि अमित जाधव, अशी ललित पाटील पलायन प्रकरणात निलंबित केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी अपर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दोन वेगवेगळे आदेश काढले आहेत. ससून रुग्णालयात ड्रग्ज आल्या प्रकरणात चौघा कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.
ससून रुग्णालयात आलेल्यांकडील संशयास्पद वस्तू तपासण्याची जबाबदारी या चौघांकडे होती. तरीही ससून रुग्णालयात ड्रग्ज आणले गेले. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चौघांना निलंबित करण्यात आले आहे.