Pune News : गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील हे महत्वाचे रस्ते राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग…
Pune News पुणे : पुणेकरांसाठी एक महत्वाची माहिती आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात आज, शनिवारपासून गणपतीचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी गर्दी होण्याच्या शक्यतेने शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. (Pune News )
तसेच लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता; तसेच अंतर्गत रस्ते आजपासून सायंकाळनंतर बंद केले जाणार असल्याने नागरिकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.
घरगुती गणपती आणि गौरी विसर्जनानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यास दर वर्षी गर्दी होते. यंदाही शहराच्या मध्यभागात मोठी गर्दी होण्याच्या शक्यतेने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
२३ ते २७ सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सर्व वाहनांसाठी सायंकाळी पाच ते गर्दी ओसरेपर्यंत मुख्य रस्ते बंद असतील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
जाणून घ्या बंद रस्ते व पर्यायी मार्ग..
बंद रस्ता – टिळक रस्ता : मराठा चेंबर्स ते हिराबाग चौक
पर्यायी मार्ग – जेधे चौक, नेहरू स्टेडियम
बंद रस्ता –शिवाजी रस्ता : गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
पर्यायी मार्ग – शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाण्यासाठी जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता किंवा टिंबर मार्केट मार्गे स्वारगेट
बंद रस्ता – लक्ष्मी रस्ता : हमजेखान चौक ते टिळक चौक
पर्यायी मार्ग – डुल्या मारुती चौकातून दारूवाला पूल मार्गे, हमजेखान चौकातून शंकरशेठ रस्ता मार्गे तसेच सोन्यामारुती चौकातून मिर्जा गालीब रस्त्याने मंडईमार्गे स्वारगेट
बंद रस्ता – घोरपडी पेठ ते राष्ट्रभूषण व हिराबाग चौक
पर्यायी मार्ग – शिंदे आळी, भिकारदास पोलिस चौकी, खजिना विहीर मार्गे टिळक रस्ता
बंद रस्ता – बाजीराव रस्ता : पुरम चौक ते अप्पा बळवंत चौक
पर्यायी मार्ग – टिळक रस्ता, टिळक चौक, केळकर रस्ता
हे इतर रस्ते असणार बंद..
दिनकर जवळकर पथ ते पायगुडे चौक, गोटीराम भय्या चौक ते गोविंद हलवाई चौक, पानघंटी चौक ते गंज पेठ पोलिस चौकी हे रस्ते बंद असणार आहे.