Pune News : पुणे अपघात प्रकरणी कारवाईला वेग! कोझीजचे मालक प्रल्हाद भुतडा, ब्लॅकच्या मॅनेजर अन् कर्मचाऱ्यांनाही पोलीसांनी केली अटक, धक्कादायक माहिती आली समोर…

Pune News : कल्याणीनगरमध्ये घडलेल्या भीषण अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला पब-बारमध्ये प्रवेश देऊन त्याला आणि त्याच्या मित्रांना मद्य पुरवल्याप्रकरणी मॅरियट सुट्समधील ब्लॅक आणि मुंढवा येथील कोझीज या पबच्या चालक मालकांना पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. याप्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. आपघाताचा तपास खडकी सहाय्यक पोलीस आयुक्त करीत आहेत. तर, दुसऱ्या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.
हॉटेल कोझीजचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर तसेच ब्लॅकचे व्यवस्थापक संदीप सांगळे, जयेश बोनकर यांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच ब्रह्मा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक विशाल आगरवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. Pune News
या सर्वांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ३, ५, १९९ अ, अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे कलम ७५, ७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ महादेव तोडकरी यांनी फिर्याद दिली आहे.
अल्पवयीन मुलाने दारू पिऊन, गाडी चालवून दोघांना उडवल्याचे हे प्रकरण सध्या फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यभरात गाजत असून अवघ्या काही तासांतच त्याला जामीन मिळाल्यानेही संताप व्यक्त होत आहे. त्यातच आता त्या मुलाने एक मोठी कबुली दिली असून त्यामुळे त्याचे वडील गोत्यात सापडले आहेत.