Pune News : PMPML ड्रायव्हरला मारहाण करणारा पुण्यातील तो पोलीस अखेर निलंबित, काय आहे प्रकरण?
Pune News : पुण्यात पीएमपी बस ड्रायव्हरला पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केली होती. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
किरकोळ कारणावरून कायदा हातात घेणाऱ्या राहुल वाघमारे या पोलीस शिपायाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना निलंबित केले आहे. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
राहुल अशोक वाघमारे हे मोटार परिवहन विभागात नेमणुकीस आहेत. भागवत बापूराव तोरणे या पीएमपी ड्रायव्हरला त्यांनी मारहाण केली होती. त्यादिवशी राहुल वाघमारे रात्रपाळी संपवून दुचाकीने घरी निघाले होते.
वाडिया कॉलेज जवळ पीएमपी चालक भागवत तोरणे यांनी कट मारल्याचा राग मनात धरून त्यांनी पीएमपीला दुचाकी आडवी लावली आणि त्यानंतर बस मध्ये चढून वाघमारे यांनी ड्रायव्हर तोरणे यांना हाताने मारहाण केली. याच मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
त्यानंतर पोलीस शिपाई राहुल वाघमारे आणि पीएमपी चालक तोरणे यांच्यात समझोता झाला होता. वाघमारे यांनी संबंधित चालकाची माफीही मागितली होती. नुकसान भरपाई म्हणून ३ हजार रुपयेही दिले होते. त्यानंतर हे प्रकरण मिटले असे वाटले असतानाच आता राहुल वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.