Pune News : रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष अन् १५ लाखांचा गंडा, लोहगाव येथील महिलेवर गुन्हा दाखल..

Pune News : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आर्थिक फसवणुकीचेही अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वेत नोकरी लावण्याच्या नावाखाली १५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी लोहगाव येथील एका महिलेवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मे २०१९ ते मे २०२० दरम्यान लोहगाव येथील इंद्रायणी विहार संतनगर येथे घडली आहे. Pune News
अंकिता सुभाष कांबळे (वय. २७ रा. इंद्रायणी विहार संतनगर, लोहगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोहन सिद्राम व्हटकर (वय, ४९ रा. अशोका पार्क सोसायटी, मांजरी बु.,पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.३०) फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या दोन मुलांना रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष आरोपी महिला अंकिता कांबळे हिने दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन मुलांना नोकरी लावण्यासाठी पैशांची मागणी केली.
त्यानुसार व्हटकर यांनी दोन्ही मुलांना रेल्वेत नोकरी लावण्यासाठी अंकिता कांबळे हिला तिच्या घरी जाऊन १५ लाख रुपये दिले. पैसे घेतल्यानंतर आरोपी महिलेने नोकरी न लावता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली.
तसेच अंकिता कांबळे हिने मकरध्वज चव्हाण यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी मोहन व्हटकर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात अर्जाद्वारे तक्रार केली होती.
दरम्यान, तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी अंकिता कांबळे हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळवी करीत आहेत.