Pune News : लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या, लग्नघराच्या मांडवातून अंत्ययात्रा निघणार, घटनेने सगळेच हादरले…


Pune News : नवरदेवाने विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यातील तळेगावमध्ये मंगळवारी (ता.१६) च्या सकाळी घडली. दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या मांडवातून वाजत-गाजत वऱ्हाड जाणार होतं, आता तिथूनच नवरदेवाची अंतयात्रा निघणार आहे.

सूरज रायकर (वय. २८) असे केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, सूरज मंगळवारी बोहल्यावर चढणार होता. देहूगावात सायंकाळी साडे पाच वाजता सूरज विवाहबंधनात अडकून, नव्या आयुष्याची सुरुवात करणार होता. लग्नाची सगळी तयारी झाली होती. तळेगावातील राहत्या घरासमोर मांडव ही टाकण्यात आला होता.

याच मांडवातून आज सकाळी सुरजचं वऱ्हाड वाजत-गाजत जाणार होतं. सोमवारच्या रात्री या आनंदात सगळे झोपी गेले, पण सुरजच्या मनात काय सुरुये याची पुसटशी कल्पना कुटुंबातील कोणालाच नव्हती.

सूरजने कोणाला काहीही न सांगता, पहाटे साडे चार वाजताचं घर सोडलं. काहीवेळाने कुटुंबातील सर्वांची लग्नस्थळी पोहचण्यासाठी लगबग सुरु झाली. पण सूरज कुठंय? हा प्रश्न निर्माण झाला आणि सर्वांची धांदल उडाली.

मला हे लग्न करायचे नाही, मी आत्महत्या…

तितक्यात मामाचे लक्ष मोबाईलवर गेले, भाचा सुरजने एक मेसेज त्यांना पाठवला होता. ‘मला हे लग्न करायचं नाही, मी आत्महत्या करत आहे.’ असं त्यात नमूद असल्याचं पाहताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. मग सर्वानी परिसरात सूरजला शोधण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा घरापासून काही अंतरावर असणाऱ्या विहिरीजवळ गाडी अन काही वस्तू आढळल्या. यावरून सुरजने विहिरीत उडी मारली असेल, असा अंदाज बांधण्यात आला.

विहिरीतील पाणी शेवाळलेले होते, त्यामुळे नेमका अंदाज बांधायला कोणीच तयार नव्हते. वेळ पुढे सरकत होती, नवरी मुलीच्या घरचे देहूगावातील लग्नस्थळी वऱ्हाड घेऊन निघण्याच्या तयारीत होतेचं. तितक्यात सुरजच्या कुटुंबीयांनी घडला प्रसंग त्यांच्या कानावर टाकला आणि आम्ही पुढची घडामोड कळवेपर्यंत वऱ्हाड काढू नये, असे मुलीच्या कुटुंबियांना कळविण्यात आले.

दरम्यान, तळेगाव पोलिसांना ही याबाबतीत कळविण्यात आले, त्यांनी मावळ वन्यजीव रक्षक पथकाला पाचारण केले. त्यांनी विहिरीतील अशुद्ध पाणी बाहेर काढायला सुरुवात केली, तेंव्हा दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुरजचा मृतदेह आढळला. नवरी मुलीच्या कुटुंबियांना ही बाब कळविण्यात आली.

या घटनेने दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सूरजचा लग्नास का नकार होता? त्याने लग्न करायचे नाही, हे कुटुंबियांना आधी कळवलेहोते का? पोलीस चौकशीत याचा उलघडा होणार आहे. मात्र सध्या ज्या मांडवातून त्याचं वऱ्हाड जाणार होते. तिथूनच सुरजच्या अंत्ययात्रा निघणार आहे. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!