Pune News : पुण्यात CNG भरताना भीषण अपघात, गॅसचे नोझल उडाल्याने कर्मचाऱ्याचा डोळाच गेला, नेमकं घडलं काय?

Pune News : पुण्यातील धनकवडी परिसरतून धक्कादायक घटना समोर आली आहे. पंपावर बाईकमध्ये सीएनजी भरत असताना गॅसचं नोझल उडून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत गॅस भरत असताना नोझल अचानक उडाल्याने सीएनजी पंपावरील एका कर्मचाऱ्याला डोळ्याला जोरात लागले आहे.

या अपघातात कर्मचाऱ्याला त्याचा डोळा कायमचा गमवावा लागला आहे. पुण्यातील तीन हत्ती चौकातील एस.स्वेअर सीएनजी पंपावर ही दुर्घटना घडली असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. Pune News
हर्षद गणेश गेहलोत असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने डावा डोळा गमावला आहे. याप्रकरणी पंप मालक धैर्यशील पानसरे व राहित हरकुर्ली यांच्याविरुद्ध सहकार नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद गेहलोत पंपावर सीएनजी भरण्याचं काम करतात. रविवारी सायंकाळी ते एका दुचाकीमध्ये गॅस भरत होते.
यावेळी अचानक गॅसचे नोझल त्यांच्या तोंडावर अतिशय वेगाने उडाले. यामध्ये त्यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन त्यांना डोळा गमवावा लागला. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप चव्हाण तपास करत आहेत.