Pune News : नवले पुलाजवळ भीषण अपघात! मोटारीच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू…
Pune News पुणे : नवले ब्रिज परिसरात पुन्हा एक अपघात झाला असून या अपघातात एका पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कात्रज बाह्यवळण मार्गावर झाला असून भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीची धडक या महिलेला बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू झाला. Pune News
ललिता विजय बोरा (वय. 65 रा. आंबेगाव बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या पादचारी ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालक अनिरुद्ध खैरनार (रा. डोंबिवली, जि. ठाणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार अविनाश रेवे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ललिता बोरा या कात्रज चौक ते नवले पूल दरम्यान असलेल्या बाह्यवळण मार्गावरुन जात होत्या. आंबेगाव बुद्रुक परिसरात त्या रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी मोटार चालक खैरनार हा भरधाव वेगात आला.
त्याच्या मोटारीची धडक बोरा यांना बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन बोरा यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख करीत आहेत.