Pune News : पेट क्लिनिकमध्येच श्वानाचा मृत्यू, गळ्याचा पट्टा आवळला अन्…; दोन डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा दाखल

Pune News : वार्षिक लसीकरणासाठी आलेल्या श्वानाचा गळ्याचा पट्टा आवळल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चतुश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून श्वानाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. संजीव राजाध्यक्ष, डॉ. शुभम राजपुत आणि त्यांच्या दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिलेकडे लॅब्रोडोर जातीचा एक श्वान होता. दरवर्षी या श्वानाचे लसीकरण करणे गरजेचे असते. त्यानुसार त्या श्वानाला घेऊन पाषाण येथील विगल्स माय पेट क्लिनिकमध्ये गेल्या होत्या. लस देण्यासाठी डॉ. राजपुत आणि त्यांचे सहकारी पट्ट्याने श्वान झाडाला बांधण्यासाठी प्रयत्न करत होते. Pune News
यावेळी डॉक्टरांनी त्यांच्याकडील लावलेला पट्टा श्वानाच्या गळ्याला घट्ट बसून त्याला फास बसला. त्यामुळे श्वान जाग्यावरच खाली कोसळला. त्याला उपचारासाठी क्लिनीकमध्ये नेले मात्र दुर्दैवाने श्वानाचा मृत्यू झाला.
दरम्यान, श्वानाच्या मृत्यूनंतर डॉक्टर त्यांना काहीच न बोलता निघून गेले. या घटनेनंतर श्वान मालकाने चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखले केली. या फिर्यादीनुसार श्वानाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉ. संजीव राजाध्यक्ष, डॉ. शुभम राजपुत आणि त्यांच्या दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.