Pune News : निवडणूक आयोगाची पुण्यात मोठी कारवाई! तहसीलदार, प्रांताधिकारी, डिवायएसपी निलंबित, नेमकं झालं काय?

Pune News : पुण्यातील सासवड येथील तहसील कार्यालयातून तीन चोरट्यांनी ईव्हीएम मशीन चोरल्याने खळबळ उडाली होती. घटनेची भारत निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत या प्रकरणात पुरंदरचे प्रांताधिकारी (उपविभागीय अधिकारी), तहसीलदार अणि उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

सासवड येथील तहसील कार्यालयाच्या स्ट्रॉंगरूम मधून तीन चोरट्यांनी ईव्हीएम मशीन लंपास केली होती. यावेळी सहायक फौजदार डी. एल. माने आणि होमगार्ड जवान राहुल जरांडे हे ड्यूटीवर होते. सोमवारी सर्व जण कामावर आले असता, त्यांना स्ट्रॉंग रूमचा दरवाजा उघडा दिसला.
दरम्यान, ईव्हीएम चोरल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तहसीलदार विक्रम राजपूत यांनी देखील पाहणी करून ईव्हीएम चोरीबाबत प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. मतदान करण्याच्या डेमो (प्रात्यक्षिक) मशिनसह काही कागदपत्रांची चोरी झाल्याचे उघड झाले. Pune News

पोलिसांनी याची गंभीर दखल घेत सहायक फौजदार डी. एल. माने आणि होमगार्ड जवान राहुल जरांडे यांना मंगळवारी निलंबित केले होते. मात्र, या घटनेची दाखल थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली.
त्यांनी या प्रकरणी पुरंदर प्रांताधिकारी- वर्षा लांडगे -खत्री, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. तसेच पोलिस आधीक्षकांनी १२ फेब्रुवारी दुपारी ३ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.