Pune News : पुण्यात PMPML च्या महिला कंडक्टरला शिवीगाळ करत मारहाण, गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Pune News पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
पीएमपीएमएल बसच्या महिला वाहकाच्या हातातील मशीन हिसकावून घेत मोबाइलने मारहाण केली. तसेच बसच्या चालकालादेखील धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. बोपखेल फाटा ते वडमुखवाडी रस्त्यावर बुधवारी (ता.२२) ही घटना घडली आहे . Pune News
याप्रकरणी पीएमपीएमएलच्या वाहक महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, विकास मारुती सातपुते (वय. ३०, रा. मोशी) व एक विधिसंघर्षित बालक यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिला वाहक या पीएमपीएमएल बसमधून मनपा येथून आळंदी येथे जात होत्या. यावेळी विकास सातपुते आणि विधिसंघर्षित बालक हे फिर्यादी महिलेजवळ आले. ते महिलेची मशीन ओढून घेत होते.
दरम्यान, फिर्यादी महिलेने विरोध केला असता त्यांनी मोबाइलने फिर्यादी महिलेला मारहाण केली. यावेळी त्यांना बसच्या खाली उतरवले असता त्यांनी फिर्यादी महिला व चालकाला शिवीगाळ केली. तसेच बसच्या चालकालाही धक्काबुक्की केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.