Pune News : पुण्यात साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपाला मोठी आग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा थोडक्यात बचावले..
Pune News पुणे : पुण्यात गणपती पाहण्यासाठी मोठी क्रेझ असते. मानाचे पाच गणपती आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक पुण्यात येत असतात. गणेशोत्सवासाठी पुण्यात छोट्या मोठ्या मंडळांनी भलेमोठे देखावे उभारले आहेत. Pune News
यातच राजकीय नेतेमंडळी या मंडळांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशातच पुण्यात आज एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आरतीला आलेले असताना साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपाला आग लागल्याची घटना घडली होती.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आरतीसाठी साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपात आले होते. इथे महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
या मंदिराच्या कळसाला आग लागली आणि मंडळ पदाधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली. आग लागल्याने नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले आहे. तितक्यात पाऊस सुरु झाल्याने मंडपाला लागलेली आग विझली आणि मोठी दुर्घटना टळली आहे.
दरम्यान,आग नेमकी कशामुळे लागली? याची पुष्टी अद्याप झाली नाही. मात्र, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हायरल व्हिडीओमध्ये गणपतीच्या स्टेजला आणि मंदिराप्रमाणे उभारलेल्या सजावटीला आग लागल्याचे दिसत आहे.
व्हिडीओमध्ये बाजूला फटाके फोडले गेल्याचे देखील दिसत आहे. त्यामुळे फटाक्यांमुळे ही आग लागली नाही ना? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.