Pune News : आई-वडिलांची लाडकी लेक गेली, जनावरांना घेऊन रानात गेलेली मुलगी परतलीच नाही, नेमकं काय घडलं?
Pune News : पुण्यातील खेड तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या कळमोडी धरण परिसरात असणाऱ्या घोटवडी येथे एका १३ वर्षीय विद्यार्थिनीचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मोनिका सुरेश भवारी (वय. १३) असे पाझर तलावात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना मंगळवार (ता.२१) रोजी घडली आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यास झाल्याने घटना उशिरा समोर आली आहे. Pune News
मिळालेल्या माहिती नुसार, खेड तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या परसुल खोपेवाडी येथे मोनिका ही रानामध्ये जनावरे चारण्यासाठी घेऊन गेली होती. जनावरे दिवसभर या परिसरात चरत होती. सायंकाळ झाली जनावरे चरून घरी आली. मात्र, मोनिका आली नाही.
त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी जनावरे चारत असलेल्या परिसरात जाऊन पाहिले त्यावेळी त्यांना तिचे जरकिन (स्वेटर) आणि चप्पल आढळून आली. त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली.
मात्र, तरीही तिचा तपास लागला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी २२ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास पाझर तलावातून मोनिका हीचा मृतदेह बाहेर काढला.
दरम्यान, पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबीयांकडे देण्यात आला. मृत मोनिका ही इयत्ता आठवीमध्ये शिकत होती. नुकतीच दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि शाळा सुरू झाल्या होत्या. त्या दरम्यानच मोनिका ही जनावरे चरण्यासाठी घेऊन गेली होती. मोनिका कुटुंबात सर्वांत लाडकी होती. तिला आई वडील, मोठी बहीण, भाऊ असा परिवार आहे.
मोनिकाच्या अचानक जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मोनिका पाझर तलावाजवळ का गेली होती? की आणखी काही कारण होते का? याबाबतचा तपास खेड पोलिसांकडून केला जात आहे.