Pune News : पुण्यात ७ वर्षाच्या चिमुकल्याचा हौदात पडून मृत्यू, खेळत असताना घडली दुर्दैवी घटना…
Pune News : हौदात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही उरुळी देवाची परिसरात रस्त्याच्या कडेला बांधलेल्या हौदात घडली आहे.
तसेच याप्रकणी या दुर्घटनेस जबाबदार असल्याबद्दल जागा मालक, बांधकाम ठेकेदाराविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्फाज इसाक शेख (वय.७) असे बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
निसार वाहेदखान पठाण (वय.३२, उरुळी देवाची) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यावरून जयंतीभाई लखीरामभाई सुतार (वय.२९ रा. पिसोळी), महेश बबन कोंडे (वय-३६, रा. उरुळी देवाची) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, सुतार यांची उरुळी देवाची भागात जागा आहे. त्या ठिकाणी त्यांनी पाण्याचा साठा करण्यासाठी हौद बांधला होता. हा हौद सात फूट खोल असून हौदात सहा फुटापर्यंत पाणी होते. हौद रस्त्यालगत होता. सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्यात आली नव्हती. शेजारीच पठाण कुटुंबीय राहायला आलेले आहेत. Pune News
पठाण यांचा भाचा अल्फाज तेथे खेळत होता. खेळत खेळत तो हौदात पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अल्फाज बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून, सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत. या घटनेमुळे उरुळी देवाची परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.