पुणे महापालिकेच्या इमारतीत हेल्मेट सक्ती ! अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांचा आदेश ..
पुणे : दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापर सक्तीचा करण्यात आला आहे. हेल्मेट परिधान न करता महापालिका भवन, क्षेत्रिय कार्यालय आणि महापालिकेच्या इमारर्तीच्या आवारात येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुचाकींना प्रवेश किंवा पार्किंगसाठी परवानगी देऊ नये, असा आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सुरक्षा विभागाला दिला आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने महापालिका भवन व महापालिकेच्या शहरातील अन्य कार्यालय व इमारतींच्या आवारात दुचाकीवर येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेटचा वापर बंधनकारक केला आहे.
यासंदर्भातील तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश सुरक्षा विभागाला दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास शिस्तभंग म्हणून संबधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात नोंद करण्याचेही अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.