पुणे -लोणावळा प्रवास होणार आता सुपरफास्ट ; राज्य सरकारकडून मार्ग मोकळा..

पुणे : रेल्वे प्रवास गतिमान होण्यासाठी मार्गिकांची संख्या वाढवणे अत्यंत आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर आता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुणे रेल्वे विभागातील पुणे ते लोणावळा दरम्यान किलोमीटरच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आता मोकळा झाला आहे. राज्य सरकारने पुणे ते लोणावळा तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार या मार्गिकेचा ५० टक्के खर्च उचणार असून रेल्वे मंत्रालय ५० टक्के खर्च करेल. त्यामुळे या मार्गाचे काम वेगाने होणार आहे. या निर्णयामुळे मार्गावर प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारने (रेल्वे मंत्रालय ) काही दिवसांपर्वी महाराष्ट्रातील दोन महत्त्वाकांक्षी कॉरिडॉरची घोषणा केली होती. यामध्ये पुणे ते लोणावळा (६३ किलोमीटर) या मार्गाचा समावेश अतिव्यग्र (उच्च घनता) कॉरिडॉरमध्ये आणि दुसरा पुणे-सोलापूर-वाडी (४१२ किलोमीटर) या मार्गाचा समावेश ऊर्जा कॉरिडॉरमध्ये केला आहे. त्यामुळे सात ते आठ वर्षांत लोणावळा-पुणे-सोलापूर-वाडी या ४७५ किलोमीटरच्या अंतरावर तिसरी व चौथी मार्गिका विकसित केली जाईल. यासाठी पुढाकार घेऊन राज्य सरकार याचा निम्मा खर्च उचलणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.या मार्गिकेला राज्य सरकारची मान्यता आवश्यक होती. त्या दृष्टीने राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.
राज्य सरकारने पुणे-लोणावळा या 66 उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारणीस मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे परिसरातील विकासाला आवश्यक कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासही मदत होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
