पुण्यातील नेत्यांच्या पोरांकडं मोक्कार पैसा, आलिशान गाड्या अन् तोळं तोळं सोनं, सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? यादी आली समोर…

पुणे : महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मुंबई इतकीच पुणे महानगर पालिकेची सुद्धा चर्चा आहे. मागच्या 20-25 वर्षात पुण्याचा वेगाने विस्तार झाला आहे. मुंबई इतकच पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटच सुद्धा महत्व आहे.
आज पुण्यात अनेक नामांकित आयटी कंपन्यांची ऑफिसेस आहेत. पुण्याचं रुपडं पालटलं आहे. जुनं पुणं आणि आताच पुणं यात खूप फरक आहे. पुण्यातील राजकीय घडामोडी राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकतात.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिज्ञापत्रानुसार आता पुण्यातील काही श्रीमंत उमेदवारांची नावं समोर आली आहेत. या यादीत माजी खासदार, आमदारांच्या पुत्र, मुली, सुना यांच्या नावांचा समावेश आहे.

भाजपने पुण्यातून उमेदवाऱ्या जाहीर केल्या आहेत. यात भाजपने उमेदवारी दिलेले सुरेंद्र पठारे हे पुण्याच्या निवडणुकीमध्ये उतरलेले सगळ्यात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

त्यांच्याकडे तब्बल 271.85 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सुरेंद्र पठारे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी त्यांची मालमत्ता 271.85 कोटी रुपये एवढी दाखवली आहे.
सुरेंद्र पठारे यांच्याकडे मर्सिडिज बेन्झ, बीएमडब्ल्यू आणि इनोव्हा क्रिस्टा अशा आलिशान गाड्या आहेत. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक असून सुमारे 1.75 किलो सोन्याचे दागिने आहेत. दुसऱ्या क्रमांकावर खडकवासल्याचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे आहे. सायली वांजळे यांच्या नावावर 77.65 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते शशिकांत सुतार यांचे सुपुत्र पृथ्वीराज सुतार यांनी देखील महापालिका निवडणुकीपूर्वीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांची प्रतिज्ञापत्रानुसार 42 कोटी 51 लाख रुपयांची संपत्ती आहे.
महापालिकेची निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जाबरोबर दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार बुलेट, इनोव्हा, निसान मायक्रा सारख्या वाहनांची नोंदणी सुद्धा त्यांच्या नावावर असल्याची माहिती आहे.
माजी आमदार आणि शिवसेनेचे दिवंगत नेते विनायक निम्हण यांचे सुपुत्र चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, आता त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवत औंध बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणूक लढवत आहेत.
चंद्रशेखर निम्हण यांच्या नावावर 36 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ऑस्ट्रेलियामधून पदवी प्राप्त केलेल्या निम्हण यांच्याकडे 1 इनोव्हा, 5 दुचाकी आणि 1 बुलेट अशी वाहनं त्यांच्याकडे असून प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 25 तोळे सोनं देखील आहे.
